जालना – मराठवाड्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या
पॅकेजच्या घोषणा करूनही प्रत्यक्षात विकासकामांची प्रगती अत्यल्प आहे.
जाहीर केलेल्या योजनांपैकी अनेक योजना अद्याप अपूर्ण असून सरकार केवळ
घोषणांचे गाजर दाखवत आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी
पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी रविवारी केला. जालना शहरातील महात्मा
गांधी चमन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित
‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलनात ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख
महेश नळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड,
भगवान कदम,हनुमान धांडे,महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे, कुमार रुपवते,
अशोक आघाव, महेश पुरोहित,दिलीप घुगे, तालुकाप्रमुख कुंडलिक
मुठ्ठे,नगरसेवक गणेश नळगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी
झाले. आंदोलकांनी हातात गाजर घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दानवे म्हणाले, २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि १६ सप्टेंबर २०२३ रोजी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या
बैठका घेऊन मराठवाड्यासाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र,
या घोषणांचा आढावा घेतला तर प्रत्यक्षात केवळ दीड ते दोन टक्केच काम
झाल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला. सिंचन, पाणी आणि मूलभूत
सुविधांचे प्रश्न आजही कायम असल्याचे ते म्हणाले. जालना शहराला आजही १५
दिवसांनी पाणीपुरवठा होतो, मग विकास कुठे झाला? असा सवाल करत दानवे यांनी
जालना पाणीपुरवठा योजना, अंबड येथील ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र,
जाफराबाद पाणीपुरवठा योजना, ७२८ कोटींचा निम्न दुधना प्रकल्प, आयटीआय
इन्क्युबेशन सेंटर, मनोरुग्णालय, सीड पार्क यांसह विविध प्रकल्पांच्या
रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला.
जालना ड्रायपोर्टचे अनेकदा उद्घाटन आणि गाजावाजा करण्यात आला; मात्र
प्रत्यक्षात फलक, कमान, रेल्वे रूळ आणि गोदाम यापलीकडे काहीही दिसत नाही,
असा आरोपही त्यांनी केला. जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या घोषणेपासून ते
जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनापर्यंत विविध मुद्यांवरून
दानवे यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘लाडक्या बहिणींना दीड हजार देतात आणि
चार हजार काढून घेतात’ असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला. खतांचे
वाढते दर, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेला भाव यामुळे
शेतकरी संकटात असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतो,
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने तत्काळ कोरडा दुष्काळ
जाहीर करण्याची मागणी जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी केली. शिवसैनिक
शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून मदतीसाठी आवाज उठवतील,
असे त्यांनी सांगितले. महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी लाडकी बहीण
योजनेतून गरजू महिलांची नावे वगळल्याचा आरोप केला. आंदोलनानंतर दानवे
यांनी पदाधिकार्यांसह जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन निवेदन
दिले. त्यानंतर मनोरुग्णालय आणि ड्रायपोर्ट प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यात
आली.
‘दगडाबाई शेळके यांचे स्मारक कधी उभारणार?’
मराठवाड्याची ‘झाशीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणार्या स्वातंत्र्यसैनिक
दगडाबाई शेळके यांच्या स्मारकाची घोषणा करूनही अद्याप जागा निश्चित
झालेली नाही. घोषणा करून किती वर्षे झाली, आता स्मारक कधी उभारणार? असा
सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
१७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात समारोप
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन सुरू
असून, १७ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे या जनआंदोलनाचा समारोप होणार असल्याची
माहिती दानवे यांनी दिली.




















