बार्शी – दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून निर्माण झालेल्या रागातून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणावर धारदार तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना बार्शी शहरातील भोगेश्वरी मंदिराजवळ २७ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या हल्ल्यात शुभम अमर साळुंखे (वय २४, रा. भवानी पेठ, बार्शी) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भगवंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शुभम साळुंखे यांच्या जबाबावरून आकाश संजय चौधरी व विकी संजय चौधरी (दोघे रा. भोगेश्वरी मंदिराजवळ, बार्शी) यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी साईनाथ भोजनालय
येथे सतीश साळुंखे व आकाश चौधरी यांच्यात मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. २७ ऑगस्ट रोजी रात्री आकाश हा तलवार घेऊन भोगेश्वरी मंदिराजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर शुभम, त्याचे वडील अमर साळुंखे व चुलते विशाल साळुंखे हे घटनास्थळी गेले. यावेळी विशाल साळुंखे यांनी आकाशला वादाबाबत विचारणा केली. आकाशने विशाल यांना ढकलत असताना शुभमने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘तू आमच्या मध्ये का येतोस?’ असे म्हणत शुभमच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, शुभमचे वडील अमर यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.