मंगळवेढा – येथील प्रांत कार्यालयामध्ये असलेल्या कारागृहाशेजारी चंदनाच्या झाडावर चक्क चोरटयांनी डल्ला मारला असून याबाबत शासकिय अधिकारी व पोलिस प्रशासन यांना घटनेचे गांभिर्य न वाटल्याने वृत्त देईपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या दुर्लक्षीतपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रांत कार्यालय आवारात जुने कारागृह असून यालगत चंदनाचे भले मोठे झाड काही वर्षापासून उभे होते. या झाडामुळे या परिसराला शोभाही आली होती. या झाडाजवळच एक देवाचे छोटे मंदिरही असून अज्ञात चोरटयाने चंदन काढण्याच्या नादात मंदिरावर झाड पाडल्यामुळे मंदिराची काही तोडफोडही झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येथील कारागृहातील आरोपी नवीन तहसील कार्यालयातील कारागृहात हालविण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी शासकिय कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नसल्याचा गैरफायदा घेत चोरटयांनी बुधवारी मध्यरात्री करवतीच्या सहाय्याने ते चंदनाचे झाड बुंध्यापासून अलग करून त्यामधील सुगंधी चंदन पोकळीतून काढून घेवून गेल्याचे चित्र आहे. गुरुवारी सकाळी कार्यालयात येणार्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर वार्यासारखी बातमी सर्वत्र पसरली. शुक्रवारी दिवसभर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल होईल अशी सुज्ञ नागरिकांना अपेक्षा होती.मात्र रात्री उशीरापर्यंत अज्ञात चोरटयाविरूध्द कोणीही ना महसूल प्रशासन ना फॉरेस्ट कर्मचारी ना महसूल प्रशासन कोणीही तक्रार न नोंदविण्यास पुढे न आल्यामुळे यांच्या कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Post Views: 9