सोलापूर – साउथ सोलापूर आपटे ग्रुपच्या वतीने आयोजित ‘आपटे चषक’ क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट क्लब आणि हाय परफॉर्मन्स क्रिकेट क्लब यांनी आपापल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवले.
पहिल्या सामन्यात युनायटेड क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीराज गवळीच्या ७७ धावा, आदित्य मानेची ५३ धावांची अर्धशतकी खेळी आणि ध्रुव शिंदेच्या ३१ धावांच्या जोरावर युनायटेड संघाने २७९ धावांचा विशाल डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साऊथ सोलापूर आपटे ग्रुपचा संघ अवघ्या १५१ धावांवर आटोपला. साऊथ सोलापूरकडून राजने ३२ आणि प्रथमेशने २१ धावांची झुंज दिली. युनायटेडच्या यश लोंढेने ४ आणि ध्रुव शिंदेने ३ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. युनायटेड क्रिकेट क्लबने हा सामना १२८ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ध्रुव शिंदेला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात युनायटेड क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली, मात्र हाय परफॉर्मन्सच्या फलंदाजांनी हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. हाय परफॉर्मन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल ३१६ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये प्रथमेश थावणे (१०० धावा) आणि अभिषेक देशमुख (१०४ धावा) यांनी झंझावाती शतके ठोकली. युनायटेडकडून सम्राट बोबडेने ३ बळी तर ध्रुव शिंदे आणि वनद चिपाडे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
३१७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना युनायटेड क्रिकेट क्लबचा डाव १६४ धावांवरच मर्यादित राहिला. युनायटेडकडून ध्रुव शिंदेने ५४ धावांचे अर्धशतक झळकावले आणि सम्राट बोबडेने ४२ धावांचे योगदान दिले, परंतु इतर फलंदाजांची त्यांना साथ लाभली नाही. हाय परफॉर्मन्स संघाच्या मानस पोफळेने ३ आणि रणवीर फूनाडेने २ बळी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शतकी खेळी करणाऱ्या हाय परफॉर्मन्सच्या अभिषेक देशमुखला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.






















