सोलापूर : बंद घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी केवळ २ तासाच्या अवधीत एका व्यावसायिकाच्या बंद घरातून तब्बल साडे १३ तोळे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळ जनक घटना वसंत विहार परिसरातील ज्ञानेश्वरीनगर येथील शीतल पॅरडाइजच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवार दि. २३ जून रोजी दुपारी ३.१५ वा ते सायंकाळी ५.२० वा. चे दरम्यान घडली.
दरम्यान याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत व्यावसायिक अमर रामचंद्र पवार (वय- ३५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०१, शितल पॅराडाईज अपार्टमेंट, धानेश्वरी नगर, वसंत विहार सोलापूर )यांनी फिर्याद दिली आहे . मंगळवार रोजी यातील फिर्यादीची पत्नी व मुले पुण्याला गेली होती, तर वडील आणि भाऊ कामानिमित्त बाहेर होते. दुपारच्या सुमारास अमर पवार हेदेखील तुळजापूरहून सोलापुरात आले, त्यानंतर पुन्हा कामानिमित्त दुपारी ३ वाजता घराबाहेर पडले. पवार कुटुंबीयांच्या हालचालींवर आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या चोरांनी ते बाहेर पडताच त्यांच्या घराच्या दरवाजाची मुख्य कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व बेडरूम मधील कपाटातील
सोन्याचे २ गंठण , २ लॉकेट , अंगठ्या ,नेकलेस , कानातील टॉप्स , रिंगा ,ठुशी ,चांदीचे जोडवे व रोख रक्कम ६० हजार रुपये मिळून एकुण १० लाख ८२ हजार २५३ रुपये किमतीचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.ही चोरी दुपारी ३.१५ वा ते सायंकाळी ५.२० वा. चे दरम्यान घडली. दरम्यान फिर्यादीचे बंधू सांयकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच खाली मजल्यावर राहणाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दीपक पवार, पोलिस निरीक्षक अरविंद माने, महादेव राऊत तसेच स्थानिक पोलिस स्टेशनचे डीबी पथक आणि श्वान पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा पुढील तपास महिला फौजदार जेऊघाले या करीत आहेत .
नावालाच उच्चभ्रू सोसायटी – सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नाही – त्यामुळे चोरांचे फावले
काही दिवसांपूर्वीच या परिसरात ‘कोयता गँग’ आणि ‘चड्डी गँग’च्या हालचालींची चर्चा होती. या दहशतीमुळे नागरिक आधीच घाबरलेले असताना ही मोठी घरफोडी झाली. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या परिसरात सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारे सीसीटीव्ही कॅमेरेच उपलब्ध नाहीत. स्थानिक प्रशासनाच्या आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे चोरांचे फावले आहे.
Post Views: 20