सोलापूर – दृष्टी नसली तरी ध्येय, जिद्द आणि प्रशासनिक क्षमता असेल तर कोणतीही जबाबदारी सक्षमपणे पार पाडता येते, याचा प्रेरणादायी आदर्श सोलापूर जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील सुजित शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून, ते शंभर टक्के अंध व्यक्ती म्हणून शिक्षणाधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात, तसेच राज्यातील जिल्हा परिषदांच्या पातळीवरही अशी नियुक्ती दुर्मीळ मानली जात आहे.
शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून वर्ग-१ अधिकारी म्हणून यश मिळविले आहे. सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर तसेच शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शारीरिक मर्यादा ही प्रशासकीय कार्यक्षमतेला अडथळा ठरू नये, यासाठी आवश्यक तांत्रिक व मनुष्यबळाचे सहकार्य उपलब्ध करून दिल्यास शिंदे यांचे कामकाज इतरांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
कामकाजासाठी प्रशासनाची विशेष यंत्रणा
शिंदे यांना प्रशासकीय कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या कामकाजासाठी पूर्णवेळ विश्वासातील कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे यांच्या सूचनेनुसार संबंधित कर्मचारी कागदपत्रे, फाईल्स आणि इतर प्रशासकीय बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास मदत करणार आहे. कागदपत्रे वाचणे आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंतची विशेष मशीन घेण्याची मागणी शिंदे प्रशासनाकडे करणार आहेत. या उपकरणाच्या मदतीने कागदपत्रांवरील मजकूर त्यांना समजणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ होणार आहे.
दृष्टीपेक्षा प्रशासनिक दृष्टिकोन महत्त्वाचा
शिक्षण विभागाची मोठी जबाबदारी सांभाळताना जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर शिंदे यांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे केवळ दिव्यांग अधिकारी म्हणून न पाहता क्षमता, गुणवत्ता आणि प्रशासनिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर काम करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे.
Post Views: 5