सोलापूर – राज्यात शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असून ऑगस्ट महिनाही निम्म्याहून अधिक सरला आहे. तरीही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बालभारतीकडून तब्बल ८ कोटी ८३ लाखांहून अधिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. असे असतानाही शाळांकडून पुस्तकांची मागणी आणि तक्रारी सुरूच असल्याने पुस्तक वितरण घोडे नेमके कुठे अडले आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
शाळांमध्ये आता घटक चाचणी परीक्षाही तोंडावर आल्या आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याने शिक्षकांनी अध्यापन करायचे कसे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बालभारतीच्या गोदामांमध्ये तसेच पुस्तक विक्री केंद्रांवर पुस्तके उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना शाळांपर्यंत त्यांचा पुरवठा का होत नाही, याचा शिक्षण विभागाने गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ ऑनलाइन उपलब्ध असल्या, तरी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण केवळ डिजिटल माध्यमावर अवलंबून ठेवणे शक्य नाही. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने आणि इंटरनेटची उपलब्धता मर्यादित असताना छापील पुस्तके वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुस्तके छापली आणि त्यांचे वितरण केले, एवढ्यावर न थांबता ती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचली आहेत का, याची तपासणी शिक्षण विभागाने करण्याची आवश्यकता आहे.
चौकट
• ग्रामीण शाळांनाच सर्वाधिक फटका
राज्यातील पुस्तके न मिळालेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील शाळांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. शिक्षण विभाग, स्थानिक यंत्रणा आणि शाळा यांच्यातील समन्वयाचा अभाव यामागे असल्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
चौकट
जवळपास १० कोटी पुस्तकांपैकी ८.८३ कोटींचे वितरण
राज्यात दरवर्षी जवळपास १० कोटी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. यंदा आतापर्यंत एकूण ८,८३,९६,५२० पुस्तकांचे वितरण झाल्याची आकडेवारी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांच्याकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये यंदा आतापर्यांत एकूण ८,८३,९६,५२० वितरण झाले, समग्र शिक्षा व पीएमश्री मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत नियमित पाठ्यपुस्तके – ५,७१,२६,३३५, लार्ज प्रिंट पुस्तके – ४३,३९७, खुल्या विक्रीतील इयत्ता पहिली ते आठवीची नियमित पाठ्यपुस्तके १,१९,६६,५४०, खुल्या विक्रीतील इयत्ता नववी ते बारावीची नियमित पाठ्यपुस्तके – १,९२,२०,९९८, पाठ्येत्तर पुस्तके – ३९,२५० या पुस्तकांचा समावेश आहे.
कोट
राज्यातील शाळांच्या पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याची प्रक्रिया चार टप्प्यांत होते. शाळांकडून थेट बालभारतीकडे मागणी येत नाही. संबंधित यंत्रणांकडून मागणीची माहिती प्राप्त झाल्यानंतरच पुस्तकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे ज्या शाळांकडून मागणीच प्राप्त झालेली नाही, त्यांना थेट पुस्तके देणे शक्य नाही.
– अनुराधा ओक, संचालिका, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ
कोट
राज्यातील अद्यापपर्यंत काही शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठपुस्तक उपलब्ध झाली नाहीत. प्रथम घटक चाचणी ची परीक्षा तोंडावर असताना देखील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी पुस्तक उपलब्ध न झाल्याने परीक्षेत उत्तर कसे लिहायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी भाग, दुष्काळी भाग आणि वस्ती वाड्यावर राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक उपलब्ध उपलब्ध करून द्यावी.
– प्रशांत शिरगुर,राज्य उपाध्यक्ष डी.एड बी.एड स्टुडन्ट/पवित्र पोर्टल शिक्षक भरती