पंढरपूर – आषाढी यात्रा २०२६ दरम्यान वाखरी येथे कीर्तन करत असताना दिगंबर जाधव ( वय ६०, रा. हदगांव, जिल्हा नांदेड ) या वारकरी भाविकास तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने सदरील रुग्ण स्वतःहून तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे दाखल झाला.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व मा आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे, आषाढी यात्रा २०२६ आयसीयू नोडल अधिकारी डॉ. महेश कुमार सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ. सीमा इंगोले यांनी रुग्णाचा ECG काढून तातडीने रुग्ण आयसीयू मध्ये दाखल केला व त्यास थ्रोम्बोलायसिस (Thrombolysis) करण्यात आले.
रुग्णास वेळेत थ्रोम्बोलायसिस (Thrombolysis) उपचार देण्यात आले. या उपचारामुळे रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात मदत झाली आणि रुग्णाची स्थिती स्थिर करण्यात आली. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय उपचार व सतत देखरेखीखाली रुग्णाची प्रकृती सुधारली. सध्या संबंधित वारकरी भाविकाची प्रकृती चांगली असून तो धोक्याबाहेर आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांनी दिली.
आषाढी यात्रेदरम्यान वारकरी भाविकांना तत्पर, दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत.
Post Views: 18