दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या लाभासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी गावपातळीवरच अर्ज स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पात्र असूनही एकही कुटुंब अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील १४ हजार ३९३ पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार गावपातळीवर अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्य ऐवजी निर्धारित रक्कम मिळत आहे. एकीकडे दुष्काळामुळे कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असताना दुसरीकडे अन्नधान्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळवून देण्याची भूमिका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली आहे. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागू नये, यासाठी तलाठी, किंवा रास्त भाव दुकानदार यांच्याकडे गावातच अर्ज स्वीकारले जातील. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी शक्यतो उपलब्ध शासकीय अभिलेखांच्या आधारे करावी. गरजेनुसार गावातच अर्ज व हमीपत्र भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करेल. प्राप्त अर्जांची पात्रतेनुसार तातडीने पडताळणी करून मंजूर लाभार्थ्यांना नियमानुसार अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित करून विशेष मोहीम राबविण्याचे ठरले असल्याच्या माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
रेशन धान्याच्या वितरणात अनियमितता होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाने रास्त भाव दुकानांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे. लाभार्थ्यांना देय असलेल्या धान्यात कपात होत नाही ना, याची खातरजमा करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत दक्ष राहावे, अशा सूचनाही आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुष्काळाच्या काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्य मिळणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राहता त्यांच्या जगण्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करणे आणि मंजूर धान्य पूर्णपणे मिळत असल्याची खात्री करणे, या दोन्ही बाबींना प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रेशनच्या धान्यात कपात करू नका!
दरम्यान, धाराशिव शहरातील स्वच्छता कामगार महिलांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन रास्त भाव दुकानांतून मिळणाऱ्या रेशन धान्याच्या कपातीबाबत तक्रारी मांडल्या. नियमानुसार पात्र कार्डधारकांना प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो तर अंत्योदय कार्डधारकांना सध्या प्रति कुटुंब दरमहा ३५ किलो धान्य मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पूर्ण धान्य दिले जात नसल्याचे महिलांनी सांगितले. काहींना पाच किलोऐवजी केवळ दोन ते तीन किलो धान्य मिळत असल्याची तक्रारही त्यांनी केली. या तक्रारींची दखल घेत पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि रास्त भाव दुकानदार प्रतिनिधींशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेत गोरगरिबांच्या अन्नधान्याच्या हक्कात कपात न करता त्यांच्या हक्काचे सर्व धान्य त्यांना द्या अशा सूचना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.























