
पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं हाचळवळीचा केंद्रवर्ती हेतू ठेवून शेतकर्याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली.
या वर्षीची 34 वी पाणी संघर्ष परिषद जोगेेशरी मंगल कार्यालय, बायपास रोड मंगळवेढा येथे शुक्रवार, 26 जून रोजी दु. 1 वाजता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आणि विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची 34 वी पाणी संघर्ष परिषद होणार आहे.अशी माहिती कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे दिली आहे. शेतकर्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी संघर्षातून हक्काचे पाणी मिळू शकते. भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी.
उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ 6 व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करण्यासाठी, माण व भीमा नदीवर बॅरेगेट बांधणे यासह पाण्यासंदर्भातील अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी ही पाणी संघर्ष परिषद होत आहे. या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नागनाथ नायकवडी हे आहेत.
दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार्या 34 व्या पाणी संघर्ष परिषदेमध्ये सांगोल्याचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, तासगाव – कवठेमहांकाळचे आमदार रोहित आर. आर. पाटील, जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, गौरव नायकवडी, यांचेसह ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विेशंभर बाबर, आनंदराव पाटील, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. सी. पी. गायकवाड, व्हि.एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज हे प्रमुख वक्ते सहभागी आहेत.
पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्या शेतकर्यांना कृष्णा खोर्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठीचा संघर्ष पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी या देशभक्ताने 11 जुलै 1993 रोजी पहिली पाणी परिषद घेऊन पुकारला. त्याला आता 33 वर्षे पूर्ण होत आहेत. आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची चळवळ उभी केली. स्व. नागनाथअण्णा व स्व. आ. भाई डॉ. गणपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून अत्यंत चिवटपणे जनतेने लढा देऊन सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडाळाची स्थापना करायला भाग पाडले. गेल्या 11 वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावात पाणी आले. पाणी संघर्ष परिषदेचा हा आजवरचा यशस्वी इतिहास आहे. हा एका दीर्घ लढ्याचा इतिहास आहे. अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाणी लढाईसाठी अजूनही शेतकर्यांना लढावे लागणार आहे. त्यासाठीच या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने 34 व्या पाणी परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन पाणी संघर्ष चळवळचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्यावतीने करण्यात आले आहे.















