बार्शी – तालुक्यातील देवगांव येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १७ जुलै रोजी संध्याकाळी घडली. बाबुराव दशरथ चव्हाण (वय ५५ वर्षे, रा. देवगाव (मा), ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव चव्हाण यांनी १७ जुलै रोजी संध्याकाळी ७:२० वाजेच्या सुमारास त्यांच्या देवगाव येथील राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले.
या घटनेची माहिती बार्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बार्शी तालुका पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे या प्रकरणाची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
बाबुराव चव्हाण यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा अहवाल बार्शीच्या तहसीलदारांना पाठविण्याची तजवीज पोलिसांनी ठेवली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 16