सोलापूर – विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ही कौतुकाची पाठीवर दिलेली थाप प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास महापालिकेतील सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला.
शनिवारी, जुळे सोलापुरातील मांगल्य मंगल कार्यालयात भंडारकवठे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन, जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समाजभूषण’ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. उद्योगपती श्रीशैल बहिरगोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य इकबाल तांबोळी (शैक्षणिक), नंदकुमार वारे (पत्रकारिता), कल्लप्पा फुलारी (शैक्षणिक), सुनीता ढवळेश्वर (शैक्षणिक), हणमंत पैलवान पुजारी (सामाजिक), हणमंत दहिवडे (उद्योजक), चिदानंद कोटगोंडे (कृषी), रवी राठोड (क्रीडा), राजश्री बहिरगोंडे (उद्योजिका) आणि प्रकाश जाधव (आदर्श पालक) यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणातून गुरु फॉर लाईफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निंगराज विंचूरे यांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.पुरस्कार प्राप्त प्राचार्य इकबाल तांबोळी,हणमंत दहिवडे,राजश्री बहिरगोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
भंडारकवठेचे सरपंच भिमाशंकर बबलेश्वर, राज्य उत्पादन शुल्कचे सेवानिवृत्त अधिक्षक भीमाशंकर बिराजदार. माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी, मल्लिकार्जुन गुरव, उद्योगपती शशिकांत जिडीमनी
हनुमंत बहिरगोंडे, शिवशंकर वठारे, डी. डी. पाटील, सुरेश पाटील,चिन्नया स्वामी, जलवादी, मायप्पा कुंभार यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता स्वामी व मनोरमा जिडीमनी यांनी केले तर रामचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.

























