पिलीव – किरकसाल (ता. माण, जि. सातारा) येथे किरकसाल संवर्धन प्रकल्प (२०२३–२०२४) अंतर्गत आयोजित अहवाल प्रकाशन व वन्यजीवरक्षक सन्मान सोहळ्यात माळशिरस तालुक्यातील जळभावी येथील कर्तव्यदक्ष वन्यजीवरक्षक अण्णासाहेब सुळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या निसर्गसंवर्धनातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. माळशिरस वन विभागात कार्यरत असलेल्या अण्णासाहेब सुळ यांनी वनक्षेत्रातील पशुपक्ष्यांसाठी अनेक वेळा पाणपोई व खाद्यभांडार उभारून वन्यजीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य केले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र कालावधीत त्यांनी पुढाकार घेऊन पाण्याची व्यवस्था केल्यामुळे असंख्य पक्षी व वन्यप्राणी यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व नि:स्वार्थ सेवेचे कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले. सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री नाथ मंदिर, आदर्शगाव किरकसाल येथे हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य मा. श्री. सुनील लिमये उपस्थित होते. तसेच उपवनसंरक्षक सातारा मा. श्री. अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक मा. श्री. दिगंबर जाधव, वनक्षेत्रपाल मा. श्री. अमित मुजिक व मा. श्री. नितीन आटपाडकर यांची उपस्थिती लाभली.
माणदेशाच्या माळरानावरील ६०६ दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनाच्या ऐतिहासिक उपक्रमात अण्णासाहेब सुळ यांचा सन्मान हा माळशिरस तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. फोटो _ अण्णासाहेब सुळ यांचा सन्मान करताना






















