सांगोला – राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही असा विश्वास माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. ते जवळा (ता.सांगोला) येथे कार्यतपस्वी आमदार कै.काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन याचे उद्घाटन व रा.७ ते ९ पर्यंत मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद या संकल्पनेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, ॲड.यशराजे साळुंखे पाटील, भाजपाचे नेते संभाजी आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुण घुले सरकार, सुनील साळुंखे पाटील, ग्रा.पं.अधिकारी दत्तात्रय रसाळ उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, आज शासकीय इमारतीचे उद्घाटन होत असताना मला मनस्वी आनंद आहे. कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक, महिला, मुलींच्या शाळेची कामे या एकाच ठिकाणी होणार आहेत. कागदासाठी आता सांगोला जाण्याची गरज नाही. ही व्यवस्था होत असताना काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्यातून घडत आहे यातच मोठे समाधान आहे. यावेळी सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करून जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी व तालुक्यांनी घ्यावा असे आवाहन उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सज्जन मागाडे यांनी केले. याप्रसंगी जवळा व पंचक्रोशीतील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अतोनात प्रयत्नानंतर शासकीय सर्व विभागीय कार्यालय एकाच छताखाली सुरू होणार आहेत. यामधून शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. यामधून निश्चित पणाने नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील असा विश्वास आहे. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत सुरू होत असून हे आपले भाग्य आहे.
– ॲड.यशराजे साळुंखे पाटील
























