सांगोला – शहरासह तालुक्यात गेली दोन दिवस वातावरणात बदल झाला होता परंतु आता परत कडक ऊन पडत आहे. याबाबत सध्या कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी किंवा पातळ पदार्थ प्या, सुती कपडे वापरा, आणि सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणे टाळा असे आवाहन सांगोला शहरातील अमृतयोग हॉस्पिटलचे डॉ.अभिजित सोनलकर यांनी केले.
उष्माघात टाळण्यासाठी डोके झाकून ठेवा, कैरीचे पन्हे, ताक, लिंबू पाणी यांसारख्या थंड पेयांचा आहारात समावेश करा. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा. दुपारी बाहेर पडणे टाळा: सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कडक ऊन असते. या काळात घराबाहेर जाणे टाळा. सैलसर, हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा. बाहेर पडताना छत्री, टोपी, स्कार्फ किंवा रुमालाचा वापर करून डोके आणि मान झाकून ठेवा. पचायला हलका आणि ताज्या अन्नाचे सेवन करा. चक्कर आल्यासारखे वाटल्यास किंवा उष्णतेचा त्रास झाल्यास तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी बसा. याप्रमाणे आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा असे आवाहन डॉ.अभिजित सोनलकर यांनी केले आहे.






















