सोलापूर : बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सर्वधर्मसमभाव, समता, स्त्री स्वातंत्र्य, कामाचे महत्त्व यासह आदर्श विचार दिले. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या वचनांचा प्रसार व प्रचार करण्याची गरज आहे. आज समाज अधोगतीकडे जात आहे. त्याला प्रगतीकडे नेण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाराज यांचे विचार आचरणाची नितांत गरज आहे, असा उपदेश
विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यानी दिला.
येथील लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा तसेच मानद पदवीदान व सत्कार समारंभ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ॲम्फी थिएटर) उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. नंदगाव येथील विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ , बाबासाहेब कुलकर्णी, पुष्पा गुंगे, मल्लिनाथ पाटील, नीलकंठ कोनापुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांचे आशीर्वचन झाले.
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी आदर्श विचार दिले. त्यांच्या वचन आणि विचारांचे आचरण सद्यस्थितीत केल्यात गुन्हे घडणार नाहीत. एक आदर्श समाज निर्माण होईल.. प्रामाणिकपणा आणि शिलाचे पालन केल्यास समाजात गुन्हे घडणार नाहीत. यामुळे शिक्षा करण्याचीही गरज भासणार नाही. कामाला महत्त्व दिले पाहिजे असे महात्मा बसवेश्वर महाराजांनी त्यावेळी सांगितलं. त्यांचे वचन आचरणात आणण्याची गरज आहे.
माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत 111 जन्मठेप आणि दोघांना फाशीची शक्षा झाल्या. गेल्या दोन दिवसात सोलापुरात आज खुनाच्या घटना घडल्या. मोठ्या शिक्षा होऊनही समाजातील हे गुन्हेगारीकरण थांबत नाही. यामुळे महापुरुषांचे विचार गरजेचे आहेत. धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी होत आहे. संसार उध्वस्त केले जात आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज भासत नाही. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वचनांचा प्रसार आणि प्रचार सर्वसामान्य पर्यंत केला पाहिजे. तरुण पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे. त्यात मोठे नुकसान होत आहे. ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, बसव सेंटर सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर व बसव कालीन शरण आणि शरणी यांच्या बसव साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाव्दारे प्रचार व प्रसार करण्याचे कार्य गेल्या ४५ वर्षा पासून हे काम निरंतर चालू आहे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करुन अनुचित चालीरिती, परंपरापासून मुक्त करणे व चांगल्या डोळस विचाराची समाजामध्ये पेरणी करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
वचन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योती बोरामणी यांनी आभार मानले.
या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान
यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार, प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना बसवभूषण, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक प्रा. डॉ.सुनील विभुते यांना बसवरत्न, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक हिप्परगी यांना बसवश्री तर नगरसेवक रुद्रेश बोरामणी यांना बसव तत्वश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विजय छंचुरे यांच्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला आदर्श संस्था म्हणून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल, माळ, शेला , श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


























