पंढरपूर – येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यादरम्यान मंदिरांमध्ये सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा ऐतिहासिक दगडी रांजण सापडला आहे. हा रांझण विठ्ठल भक्त माणकोजी बोधले यांनी १६४० मध्ये बाजीराव पडसाळी मध्ये बसवल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या जुन्या दुर्मिळ अशा पाषाणा पासून तयार केलेल्या रांझणाची पुनर्स्थापना याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सोलापूर तरुण भारतशी बोलताना दिली.
विठ्ठल भक्त माणकोजी बोधले यांनी त्याकाळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व पूजेसाठी या रांजणातील पाण्याचा वापर केला जात होता. या रांजणाला बोधलेबुवांचा रांजण असेही त्याकाळी संबोधले जायचे. सुमारे चारशे वर्षानंतर दुर्मिळ दगडी रांझण सापडल्याने याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शना खाली विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या बाजीराव पडसाळी भागामध्ये नवीन दगडी फर्शी व डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. या दरम्यान जुना दगडी रांजण आढळून आला आहे. हा दगडी रांजण ४०० वर्षांपूर्वीचा जुना असून तब्बल दोन टन वजनाचा आहे. यामध्ये जवळपास दोनशे लिटरहून अधिकपाणी मावते असा हा भला मोठा रांझण भाविकांची लक्ष वेधून घेत आहे.
संत माणकोजी बोधले महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत व समाजसेवक होते. त्यांनी विठ्ठल भक्ती बरोबरच समाजोपयोगी कार्ये केली.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयव्हावी यासाठी त्यांच्या पुढाकारातून हा रांझण बसवण्यात आल्याची आख्यायिका सांगितली जाते.
गहिनीनाथ महाराज औसेकर
( सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर)


























