
सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यूआयटी)च्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयएसईआर) तसेच होमी भाभा राष्ट्रीय संस्था (एचबीएनआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट तीर्थ’ अंतर्गत आयोजित प्रतिष्ठित ‘इकोज ऑफ द पास्ट चॅलेंज’ स्पर्धेत डब्ल्यूआयटीच्या ‘सोनलगी’ टीमने ३५ हजार रुपयांच्या पारितोषिकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.
देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्था आणि संशोधन गटांच्या सहभागातून पार पडलेल्या या स्पर्धेत ‘सोनलगी’ टीमने श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराचा त्रिमितीय (3D) डिजिटल वारसा प्रकल्प सादर केला. अचूकता, सखोल अभ्यास आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर या प्रकल्पाने परीक्षकांची विशेष दाद मिळवली.
आदित्य बांगर, शुभम वर्मा, साईराम कटकम, पद्मराज कासार आणि समृद्ध बगले या मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मंदिराचे अत्यंत बारकाईने डिजिटल दस्तऐवजीकरण केले. फोटोग्रामेट्री, 3D स्कॅनिंग आणि डिजिटल मॉडेलिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मंदिराच्या स्थापत्यशैलीतील सूक्ष्म तपशील अचूकपणे साकारण्यात आले.
या प्रकल्पाला प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रा. योगेश जंगले आणि प्रा. वैभव कुलकर्णी यांनी सहकार्य केले. तसेच इंटॅक सोलापूर आणि छायाचित्रकार भरत छेडा यांचेही मोलाचे योगदान लाभले. प्रकल्पाची गुणवत्ता, संशोधननिष्ठ मांडणी आणि तांत्रिक अचूकतेचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “भारतीय सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. वालचंदचे विद्यार्थी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत, ही अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या यशामुळे डब्ल्यूआयटीची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील भक्कम ओळख अधिक अधोरेखित झाली असून, सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवाला जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे साकारले आहे.


















