सोलापूर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरावरील पाहणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता निवड झालेल्या गावांच्या गुणांकनाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच गावांची निवड करण्यात आली असून, पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय पथक या गावांची प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम अहवाल तयार करणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अभियानाअंतर्गत गावांमध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामविकास, डिजिटल सुविधा, महिला सहभाग, कर वसुली, पर्यावरण संवर्धन आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. तालुकास्तरीय समित्यांनी प्राथमिक पाहणी करत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांची निवड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे २० टक्के गावांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून निवडलेल्या गावांचे गुणांकन सुरू आहे. आता जिल्हास्तरीय टीम पुढील दोन दिवसांत संबंधित गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे. या पाहणीनंतर अंतिम गुणांकन करून उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयतेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाहणी करणाऱ्या पथकांकडून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा दबाव टाळत निष्पक्ष मूल्यांकन केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोणत्या गावाला किती गुण मिळाले, याची माहिती अंतिम निर्णयापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावांमध्ये विकासकामांची स्पर्धा निर्माण झाली असून, “आदर्श गाव” ठरण्यासाठी ग्रामपंचायती प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थही सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
चौकट
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज
अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुकास्तरीय समितीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील २० टक्के म्हणजे २२० गावांची पाहणी केली. पाहणी संपल्यानंतर उत्कृष्ट पाच गावांना गुणांकन देऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ गावांची निवड होणार आहे. यातील प्रथम व द्वितीय गावांची पाहणी जिल्हास्तरीय पथक करणार आहे. ग्रामविकास विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय पाहणी आणि मूल्यमापन पूर्ण झाले आहे.
चौकट
जिल्हास्तरीय मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी बीडचे अधिकारी जिल्ह्यात येणार
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर आणि इतर संबंधित समित्यांनी हे मूल्यमापन केले आहे. तालुकास्तरीय पाहणी पूर्ण झाली. तालुकास्तरीय मूल्यांकनानंतर पात्र ग्रामपंचायतींचे अहवाल जिल्हा समितीकडे पाठवण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत जिल्हास्तरीय मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी बीडचे अधिकारी जिल्ह्यातील गावागावात जाणार असून, त्यानंतर पुढील टप्प्यात विभागीय व राज्यस्तरीय समित्यांची पाहणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाने दिली.
कोट
अनेक गावांनी चांगली कामगिरी केली
तालुकास्तरीय पथकाने पाहणी करून ग्रामपंचायतींना मूल्यांकन दिले आहे. मूल्यांकनानुसार प्रत्येक तालुक्यातील चांगल्या पाच गावांची पाहणी जिल्हास्तरीय टीम करणार आहे. जिल्हास्तरीय पाहणीनंतर विभागीय टीम पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अनेक गावांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.
– सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
Post Views: 35