सोलापूर : भारत सरकार तसेच पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांतील २९ गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला तब्बल ४ कोटी २८ लाख २७ हजार ६३५ रुपयांच्या अंमली पदार्थांचा नाश केला. यामध्ये १६९७ किलो ४२९ ग्रॅम गांजा तसेच १९ किलो ६१८ ग्रॅम अफू व अफूची झाडे यांचा समावेश आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने जिल्ह्यात मागील काही वर्षांत दाखल झालेल्या अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेल्या प्रकरणांतील मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये १६९७ किलो ४२९ ग्रॅम गांजा, ज्याची किंमत ४ कोटी २४ लाख ३५ हजार २७५ रुपये आहे, तसेच १९ किलो ६१८ ग्रॅम वजनाचे अफू व अफूची झाडे, ज्यांची किंमत ३ लाख ९२ हजार ३६० रुपये आहे, असा एकूण ४ कोटी २८ लाख २७ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
दि. १५ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, वजन मापन निरीक्षक सुधीर खांडेकर, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अभिजीत लोहीया, सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. गु.रा. देशमुख तसेच वैज्ञानिक सहाय्यक राहुल पाटील उपस्थित होते.
सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रुप, वळसंग, अक्कलकोट दक्षिण, बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, कुर्डुवाडी, करमाळा, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण, करकंब, मंगळवेढा आणि अकलूज या पोलीस ठाण्यांतील एकूण २९ गुन्ह्यांमधील मुद्देमालाचा यात समावेश होता.
शासकीय पंच रोहन लोंढे आणि विकास थोरात, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मुद्देमालाची पुन्हा वजन तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या पथकाकडून नमुन्यांची तपासणी करून सदर मुद्देमाल गांजा व अफू असल्याचा अंतिम अभिप्राय देण्यात आला.
यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोमधील एस.एस. सर्व्हिसेसच्या इन्सिनरेटरमध्ये समितीच्या उपस्थितीत हा संपूर्ण मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व पोलीस उपअधीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर ताटे-देशमुख, सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, कमल बुरकुल, आबासाहेब मुंढे, हरीदास पांढरे, अनिस शेख, गणेश बांगर, अश्विनी गोटे, दिपाली जाधव, अशोक हलसगी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील मुद्देमाल कारकून यांनी पार पाडली.
Post Views: 8