सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक संवर्गाच्या भरती प्रक्रियेत मोठा व ऐतिहासिक बदल करत टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे राज्यभरातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो उमेदवारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यापूर्वी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्वतंत्र टंकलेखन प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागत होती. या परीक्षेत मराठी अथवा इंग्रजी टंकलेखनातील वेग आणि अचूकता तपासली जात होती. मात्र, अनेक उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही प्रत्यक्ष कौशल्य चाचणीत छोट्या चुका झाल्याने त्यांची अंतिम निवड हुकत होती. परिणामी, मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळवूनही अनेक गुणवंत उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागत होते.
आता आयोगाने ही प्रात्यक्षिक परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यामुळे मुख्य परीक्षेनंतर थेट अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांकडे आवश्यक असलेली मराठी ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट टंकलेखन प्रमाणपत्रे नियुक्ती प्रक्रियेवेळी संबंधित विभागामार्फत पडताळली जाणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेतील अतिरिक्त टप्पा कमी होऊन निकाल जाहीर होण्यास होणारा विलंबही टळणार आहे.
या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांना वारंवार होणारा प्रवास, परीक्षा केंद्रांचा ताण आणि प्रात्यक्षिक परीक्षेची भीती यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रशांत शिरगुर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “टंकलेखन प्रमाणपत्र असूनही केवळ प्रात्यक्षिक परीक्षेमधील तांत्रिक चुका उमेदवारांच्या भवितव्यावर परिणाम करत होत्या. आयोगाने घेतलेला निर्णय हा गुणवत्तेला न्याय देणारा आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.”
या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष केवळ मुख्य परीक्षेतील गुणवत्तापूर्ण तयारीवर केंद्रित होणार असून, स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त टप्पा अखेर इतिहासजमा झाला आहे.
Post Views: 24