सोलापूर – उन्हाळा सुट्टीनंतर येत्या सोमवार, १५ जूनपासून जिल्ह्यातील २ हजार ७६८ शाळांची घंटा वाजणार असून नव्याने प्रवेश घेणार्या तसेच नियमित विद्यार्थ्यांच्या स्वागताची जिल्हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे. गावोगावी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांचा शाळेकडे ओढा वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभातफेरी, स्वागत रॅली, पुष्पवृष्टी, गुलाबपुष्प, चॉकलेट आणि विविध गोड पदार्थांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. विशेषतः प्रथमच शाळेत येणार्या चिमुकल्यांसाठी आकर्षक सजावट, फुगे आणि आनंददायी वातावरण तयार करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षण समित्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील शिक्षक दोन दिवस अगोदरच शाळेत उपस्थित राहून वर्गखोल्या, परिसर स्वच्छता, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि स्वागत कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.
यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे २२ लाख पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून त्यापैकी १८ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. तसेच १ लाख ८० हजार ५२७ विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची तयारी पूर्णत्वास येत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम संस्मरणीय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
चौकट
स्वागताचा असा असेल जल्लोष
*जिल्ह्यातील २,८६८ शाळा १५ जूनपासून सुरू
*नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत
*प्रभातफेरी, स्वागत रॅली आणि सांस्कृतिक उपक्रम
*पहिल्याच दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण
*गावोगावी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित
*शाळांमध्ये आकर्षक सजावट व आनंदोत्सवाचे वातावरण
कोट
विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत
जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नवागत आणि नियमित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करून शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
Post Views: 10