
पंढरपूर – तालुक्यातील आंबे गावातील परिसरात भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करत असताना तालुका पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये टिपर, चार ब्रास वाळू असा सुमारे १६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी टिपर चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उपविभागीय पो लीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवैध वाळू उपशावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी पोलिसांना अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. लगेच पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई केली. यावेळी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून टिपरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टिपर व चार ब्रास वाळू असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक व मालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस कर्मचारी मंगेश रोकडे यांच्या पथकाने केली.























