पंढरपूर – वस्तुंवर छापलेल्या अनियंत्रित एमआरपी किंमतीद्वारे सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबवा यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने १२ जून रोजी देशव्यापी सत्याग्रह आंदोलन सुरु केले असून जिल्ह्यातील तहसील कार्यालय परिसरात ते होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
ग्राहकांना योग्य दरात वस्तू व सेवा मिळाव्यात म्हणून वस्तुची किरकोळ विक्रीची कमाल किंमत छापण्याचे शासनाने बंधनकारक केले.मात्र याचा गैरफायदा घेत अवाजवी एमआरपी छापून ग्राहकांची लूट चालू आहे.ग्राहकांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे.शासनाकडून अद्यापही योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ग्राहक पंचायतीने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ मे पासून देशभरातील ग्राहकांकडून अवाजवी एमआरपी विरुद्ध पंतप्रधान,अर्थमंत्री,वाणिज्य मंत्री,उद्योग मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री यांना लाखो ईमेल पाठविण्यात येत आहेत. तसेच स्वाक्षरी मोहीमही सुरू आहे.
दैनंदिन गरजेच्या वस्तू, विशेषतःपॅकिंग केलेल्या वस्तू, कापड,ईलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तू रेडीमेड,पादत्राणे,औषधे इ. अनेक वस्तूवर २००% ते ३००% अवाजवी एमआरपी छापल्याने जास्त पैसे देऊन ग्राहक थकला आहे.हा एक “कायदेशीर” मार्ग झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मा.पंतप्रधान आणि अर्थमंत्री,ग्राहक संरक्षण मंत्री,वाणिज्य मंत्री यांना सध्याचा एमआरपी कायदा रद्द करण्यासाठी आणि उत्पादन खर्चावरील नफा २०-३०% पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कायदा करावा यासाठी १२ जून रोजी नवी दिल्ली येथील जंतरमंतर व प्रत्येक तहसील कार्यालय याठिकाणी सत्याग्रह/धरणे आंदोलन केले जाणार आहे व निवेदन दिले जाणार आहे.
सत्याग्रह आंदोलना संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव महेश भोसले सहसचिव आझाद अल्लापूरकर,कोषाध्यक्ष सागर शिंदे,कार्यकारिणी सदस्य मंगेश देशपांडे,अमोल अभंगराव,शाम तापडिया,सुमित पारखे आदी उपस्थित होते.
दरम्यान या देशव्यापी आंदोलनात जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात येत आहे.
Post Views: 11