
सोलापूर – आगामी आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यंदा पंढरपुरात घेण्यात येणार आहे. गुरुवार दि.२५ जून रोजी सकाळी १२ वाजता स्वेरी कॉलेजमध्ये होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सभेपूर्वी आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष ठिकाणी घेण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य पालखी मार्गासह विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत.
चार वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर जिल्हा परिषदेत नव्याने लोकप्रतिनिधींचे नेतृत्व आले आहे. त्यामुळे नव्या सदस्यांना जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी. यात्रेपूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, या उद्देशाने सर्वसाधारण सभा पंढरपुरात आयोजित करण्यात आली आहे.
यंदाच्या आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली असून, वारकरी, भाविक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य पालखी मार्गावरील सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, रस्ते आणि अन्य विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
कोट
यंदाची आषाढी वारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत आहे. वारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या तयारी पूर्णत्वास जात आहेत. त्याची पाहणी करण्यात येणार असून, सदस्यांच्या मागणीनुसार सभा पंढरपूर येथे घेण्यात येत आहे.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 12