टेंभुर्णी – माढा तालुक्यातील चांदज येथील होतकरू मल्ल पैलवान हनुमंत राजेंद्र जाधव यांनी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत ४५ कि. वजनगटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांची आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोविंदा पाटील कुस्ती केंद्र,खुडूस (ता.माळशिरस) येथे प्रशिक्षण घेणाऱ्या पै.हनुमंत जाधव यांनी कठोर मेहनत,सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.देशभरातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
पै.हनुमंत जाधव हे वस्ताद महादेव ठवरे-पाटील आणि पै.बापूसाहेब ठवरे-पाटील यांचा शिष्य असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
अझरबैजानची राजधानी बाकू येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पै. जाधव देशाचा तिरंगा उंचावतील, असा विश्वास त्यांचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल गोविंदा पाटील कुस्ती केंद्र,परिसरातील नागरिक,क्रीडाप्रेमी तसेच विविध मान्यवरांनी पै.हनुमंत जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी सभापती संजय पाटील-भिमानगरकर तसेच पंचायत समिती सदस्या सुनीता संजय पाटील यांनीही पै.जाधव यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
***पै.हनुमंत राजेंद्र जाधव अत्यंत प्रतिकूल परिस्थितून जात आहे.त्यास गुंठाभर देखील जमीन नाही.आई-वडील मोलमजुरी करतात.अशात तो दहावी उत्तीर्ण झाला आहे.पुढील शिक्षण व कुस्तीचा छंद जोपासणे कठीण काम आहे.यामुळे दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन हनुमंत जाधव यास आर्थिक मदत करावी अशी मागणी ही संजय पाटील-भिमानगरकर यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेसाठी रामचंद्र टकले, वस्ताद महादेव ठवरे-पाटील,वस्ताद महादेव जाधव (करोळे),निवृत्ती तांबवे,जालिंदर लट्टे,महादेव दगडे नितीन मस्के,वडील राजेंद्र जाधव,आजोबा अंकुश जाधव आदीजन उपस्थित होते.
Post Views: 13