कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी कोल्हापूर येथे शाक्य संघ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बिगुल वादनातून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्यभरातील 100 हून अधिक सदस्य विशेष ड्रेसकोडमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कोल्हापूरच्या दसरा चौकात होणाऱ्या शासकीय जयंती कार्यक्रमात सहभागी होत खा. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर शाक्य संघ तसेच माता रमाई महिला ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने बिगुल वादन करून राजर्षींना मानवंदना दिली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, दौंड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, बीड आदी जिल्ह्यांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करण्याचा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. त्या विचारातून कार्यक्रमस्थळी उपस्थितांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, संजय कांबळे, बबनराव रानगे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. शाक्य संघाच्या वतीने कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्याचा हा सलग दुसरा उपक्रम असून, आगामी काळातही दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अशोककुमार दिलपाक, अरुण ओहळ, सुभाष सर्वगोड, गोविंद जगताप, कल्याण भंडारे, अंकुश पंडित, निवृत्ती सुरडकर, प्रकाश सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचाही मोठा सहभाग राहणार आहे.
Post Views: 10