या प्रतिनिधी मंडळात महाविद्यालयाचे उपप्राचार्य (करिअर डेव्हलपमेंट) डॉ. श्रीनिवास एस. मेतन, तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. अस्मिता पाटील, श्री. विश्वजीत पाटील आणि श्री. मयूरेश बोडके यांचा समावेश होता. या दौऱ्यात फ्रान्समधील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून विद्यार्थी इंटर्नशिप, सेमिस्टर एक्स्चेंज, प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांसाठी नवीन संधी निर्माण करण्यात आल्या.
या चर्चांमुळे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यमान सहकार्याबरोबरच आणखी तीन फ्रेंच विद्यापीठे ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच फ्रेंच विद्यापीठांनी ऑर्किडच्या विद्यार्थ्यांसाठी 2+2 आणि 3+2 एकात्मिक मास्टर्स पदवी कार्यक्रमांमध्ये विशेष रस दर्शविला आहे.
यावर्षी कु. वैष्णवी माशाळे आणि श्री. अब्दुल वळसंगकर यांनी पॅरिस येथील ए.आय.- व्हॅनसिटी टेक्नॉलॉजी ॲण्ड सोसायटी, पॅरिस (AI-VANCITY) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली. त्यांनी “Hybrid RAG System – A Complete Technical Walkthrough” या प्रकल्पावर काम करत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रकल्पाचे मार्गदर्शन श्री. नसरेदीने मिनासेल (AIVANCITY, Paris) आणि डॉ. एम. बी. पाटील (NKOCET, Solapur) यांनी केले.
तसेच कु. स्नेहल शिंदे आणि कु. समीक्षा सत्रे यांनी फ्रान्समधील प्रतिष्ठित ISAE-SUPMECA, Paris येथे चार महिन्यांची इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली.
कु. स्नेहल शिंदे यांनी “Design and Implementation of a Modular Drone Arena for Guidance, Navigation and Control (GNC) Training and Competition” या प्रकल्पावर काम केले. या प्रकल्पामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला. कु. समीक्षा सत्रे यांनी “Mechatronics Modelling of an Entire Industry 5.0 Production Line” या अत्याधुनिक प्रकल्पावर काम केले. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन, डिजिटल ट्विन, सायबर-फिजिकल सिस्टिम्स आणि इंडस्ट्री 5.0 या भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित या प्रकल्पाचे मार्गदर्शन श्री. रोमन डेलाबे (ISAE-SUPMECA, Paris) आणि डॉ. श्रीनिवास एस. मेतन (NKOCET, Solapur) यांनी केले.
ISAE-SUPMECA येथील इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना लॉ फाउंडेशन डेसॉल्ट सिस्टीम्स इंडिया आणि ISAE-SUPMECA France यांच्याकडून आर्थिक सहाय्य प्राप्त झाले, तर AIVANCITY मधील विद्यार्थ्यांना ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून अंशतः आर्थिक मदत देण्यात आली.
फ्रान्स दौऱ्यादरम्यान प्रतिनिधी मंडळाने डेसॉल्ट सिस्टीम्सच्या फ्रान्समधील वेलिझी पॅरीस येथील जागतिक मुख्यालयाला देखील भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, डिजिटल अभियांत्रिकी, इंडस्ट्री 4.0, कौशल्य विकास आणि संशोधन क्षेत्रातील नव्या संधींबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या सर्व उपक्रमांमुळे सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि बहुसांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. मागील तीन वर्षांत फ्रान्समधील 15 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चार महिन्यांच्या इंटर्नशिप पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे हे सहकार्य दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
सोलापूरमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, विद्यार्थी देवाणघेवाण आणि जागतिक शिक्षणाच्या संधी सातत्याने उपलब्ध करून देणारी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय ही सोलापूरमधील अग्रगण्य संस्था ठरत आहे. भविष्यात जर्मनीसह इतर युरोपीय देशांतील विद्यापीठांशीही अशाच प्रकारचे शैक्षणिक सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य डॉ. व्ही. के. पत्की, सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी कु. स्नेहल शिंदे, कु. समीक्षा सत्रे, कु. वैष्णवी माशाळे आणि श्री. अब्दुल वळसंगकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीला आणखी बळ मिळाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





















