सोलापूर – राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त आरोग्य व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार असून, यंदाच्या पुरस्कारासाठी सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. सतीश कोपूरवाड यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही दखल आहे.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि डी.एस.टी.एस. मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १ जुलै रोजी शिवदारे कॉलेज, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. कोपूरवाड यांनी यापूर्वी नांदेड येथे माता बाल संगोपन अधिकारी पदावर विशेष कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती दिली.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन, विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांची यशस्वी अंमलबजावणी, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न, लसीकरण मोहिमेला दिलेली गती तसेच माता-बाल आरोग्य आणि जनजागृती उपक्रमांमध्ये दिलेल्या नेतृत्वाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या सोहळ्यात जनरल फिजिशियन डॉ. राजेंद्र अग्रवाल, ईएनटी तज्ज्ञ डॉ. विद्याधर बोराडे, हृदयरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. रिझवान-उल-हक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनल चिडगुपकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत गाडे, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट श्रीधर रिसबूड तसेच सीए चंद्रकांत रच्चा यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विजय कानेटकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.एस.टी.एस. मंडळाचे राजशेखर शिवदारे राहणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरवर्षी १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरांसह आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views: 9