सोलापूर : शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून तीन वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे मुखवटे परिधान करून रखडलेल्या कामाचा प्रतीकात्मक ‘तिसरा वाढदिवस’ साजरा करत केक कापून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. टेंडर निघून तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी काम पूर्ण झालेले नाही. परिणामी हजारो नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
आंदोलनादरम्यान “तीन वर्षे पूर्ण… काम अजूनही अपूर्ण” अशा घोषणा देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, कामाला तातडीने गती द्या आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शिरीष जगदाळे, अरविंद शेळके, शेखर भोसले, विक्रम वानकर, रमेश जाधव, गणेश बोरेगाव, विजय जावळे, संजय भोसले, राहुल मेरू, संकेत कुलकर्णी, विकास बचुटे, विश्वजीत गंभीरे, लक्ष्मण गंभीरे, विजय बिल्लेगुरु, फिरोज सय्यद, सतीश वावरे, इशरत नागोरे, गुरु हडपड, रमेश चव्हाण, सन्नी पाटू, प्रकाश डोंगरे, अनिता वाघमारे, आफ्ररिंन पटेल, नेताजी देशमुख, रमेश भंडारे, उद्योग कक्षाचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, विजय जावळे आदी उपस्थित होते.


















