पंढरपूर – भेदाभेद अंमगळ अशी संतांच्या मुखातून शिकवण देणाऱ्या साक्षात परब्रम्ह पांडुरंगाच्या नगरीतच विठुरायाच्या दर्शनासाठी आजी, माजी मंत्र्यांमध्ये भेदाभेद केल्याची घटना बुधवारी घडली. याचे कारण म्हणजे आषाढी यात्रेत प्रशासनाने यंदा व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांना समर्थकांसह व्हीआयपी प्रवेश तर माजी मंत्री तथा विद्यमान आमदारांच्या कुटुंबाला देवाच्या दारात ताटकळत उभे राहावे लागले. विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्येच दुजाभाव झाल्याची घटना घडली.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील दोघेही विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे कुटुंबासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. मात्र, मंदिर प्रशासनातील असमन्वयामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्शनासाठी बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.
दुसरीकडे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे मंदिरात पोहोचताच प्रशासनाने प्रचंड तत्परता दाखवली. त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गोतावळ्याला थेट मुख्य गाभाऱ्यात नेऊन व्हीआयपी दर्शन घडवण्यात आले.
———————
( ढिसाळ नियोजनामुळे दर्शनासाठी मोठी अडचण )
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. म्हणूनच आम्ही सहकुटुंब आलो होतो. मात्र, मंदिरात व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसले. अधिकाऱ्यांत ताळमेळ आणि समन्वय नव्हता. या ढिसाळ नियोजनामुळे दर्शनासाठी मोठी अडचण झाली.
सुधीर मुनगंटीवार, (ज्येष्ठ नेते, भाजप)
———————
( प्रवास करून आलोय, दर्शन मिळायलाच हवे )
आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तब्बल अडीचशे किलोमीटर अंतरावरून प्रवास करून विठ्ठलाच्या चरणी आलो आहोत. त्यामुळे आम्हाला दर्शन मिळायलाच हवे. माझ्यासोबत आलेल्या लोकांनाही थेट सोडण्यात आले होते.
गुलाबराव पाटील, (मंत्री, शिवसेना)
Post Views: 5