बार्शी – माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या बंगला परिसरात स्फोटक स्वरुपाचे जळते फटाके टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत उर्फ पेशा रणझुंजारे, निखिल उर्फ अंबादास भरत रणझुंजारे आणि नागेश बाळू मोहिते या तीन आरोपींचा नियमित जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज व्ही. केंद्रे यांनी फेटाळला आहे.
यापूर्वी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावेळी न्यायिक दंडाधिकारी पी. व्ही. राऊत यांनी आदेश पारित केला होता. त्या सुनावणीवेळी सरकार पक्षाच्यावतीने ॲड. राहुल काजळे, फिर्यादी सुधीर सोपल यांच्यावतीने ॲड. विकास जाधव, तर आरोपींच्यावतीने ॲड. महेश जगताप यांनी काम पाहिले होते. तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव न्यायालयात उपस्थित होते.
त्यानंतर बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी जामीन अर्ज क्रमांक ५३१/२०२६ वर सुनावणी झाली. या प्रकरणात तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी अटक केलेले आरोपी नागेश बाळू मोहिते, निखिल उर्फ अंबादास भरत रणझुंजारे आणि प्रशांत उर्फ पेशा रणझुंजारे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या सुनावणीदरम्यान आरोपींच्यावतीने ॲड. महेश जगताप, सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. दिनेश देशमुख, तर फिर्यादीच्यावतीने ॲड. विकास जाधव व ॲड. प्रशांत घोडके यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, पोलीस तपासातील नोंदी आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, २३ जून २०२६ रोजी पहाटे फिर्यादीच्या घरावर जळते फटाके फेकून घराला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत आंबा, जांभूळ व बांबूची झाडे तसेच सोलर पॅनलचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
गुन्ह्याचे गांभीर्य, तपास अद्याप सुरु असणे, इतर आरोपी फरार असणे तसेच आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास ते फरार होण्याची, साक्षीदारांवर दबाव आणण्याची, पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची अथवा तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळला. हा आदेश १६ जुलै रोजी पारित करण्यात आला असून, या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
Post Views: 8