सोलापूर : सोलापूर शहरातील मंडप व्यवसायात गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे ‘एस. एम. पाटील मंडप कॉन्ट्रॅक्टर’चे भागीदार शिवकुमार सिद्धाराम पाटील यांना यंदाचा अत्यंत मानाचा ‘स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, कोल्हापूर येथे आयोजित भव्य समारंभात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते शिवकुमार पाटील यांना हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडप व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव, सचोटी आणि या क्षेत्रातील अखंड सेवेची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.
या सोहळ्यास कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार प्रा. जयंत आजगावकर, माजी आमदार राजीव आवळे, मंडप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दगडूशेठ पुरोहित, कोल्हापूर जिल्हा मंडप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी महापौर सागर चव्हाण, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सुनील वनागडे, सचिन चव्हाण, विजय सूर्यवंशी आणि मुसा शेख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी मंडप व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतरही अनेकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या संख्येने मंडप व्यावसायिक व प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवकुमार पाटील यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील व्यावसायिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 21