अकलूज – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत २५४, माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव, पत्ता, वय, लिंग, मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) तसेच मतदान केंद्राची माहिती तपासून घेण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलूज यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादीमध्ये नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलात काही त्रुटी आढळल्यास अथवा नाव समाविष्ट नसल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणी व निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी नमुना क्र. ६ (Form-6) भरता येणार आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.
मतदार यादीतील मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींचे नाव वगळणे अथवा नावाबाबत हरकत नोंदविण्यासाठी नमुना क्र. ७ (Form-7) वापरता येईल. तर नाव, जन्मतारीख, वय, लिंग, नातेसंबंधाचा पत्ता, दिव्यांगत्वाची नोंद किंवा नवीन ई-EPIC यासह अन्य दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ (Form-8) भरता येणार आहे.
नमुना ६, ७ व ८ साठी नागरिकांना Voter Services Portal तसेच Voter Helpline Appच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे मतदारांनी घरबसल्या मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक त्या दुरुस्ती किंवा नोंदणीची कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष पुनरीक्षण प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घेऊन कोणतीही त्रुटी असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलूज यांनी केले आहे.