सोलापूर : बसमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडील दागिने व मोबाईल चोरी करणाऱ्या एका आरोपीस जेरबंद करून चोरीचे १३ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
उमेर अफसर शेख (वय २७ वर्ष, व्यवसाय रिक्षाचालक, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
एसटी बस स्टॅन्ड आवरात प्रवाशांकडील दागिने चोरींच्या घटनांचा तपास करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व तपास पथकातील पोलीस हवलदार हाजीमलंग शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोलापूर शहरातील दोन नंबर एस.टी. स्टँडसमोरील मोकळ्या मैदानात एक इसम विना पावतीचे सोन्याचे गंठण विक्री करण्यासाठी थांबला आहे.
माहितीची खात्री करून पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन वरील आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सन २०२४ मध्ये सोलापूर एस.टी. स्टँड येथे एस.टी. बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे मिनी गंठण चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपी उमेर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे, ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे तसेच पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखाणे आणि शंकर याळगी यांनी पार पाडली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















