पंढरपूर – समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय, विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने येथील गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना मानाचा “याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
शहरातील श्री याज्ञवल्क्य आश्रम, याज्ञवल्क्य पथ येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या तसेच संस्थेच्या सामाजिक व विधायक उपक्रमांना उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संस्थेच्या कार्याचा परिचय तसेच मान्यवरांचे स्वागत श्रीकांत जोशी, कार्यवाह, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती मंडळ, पुणे यांनी केले.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली. यावेळी पुरस्कारार्थी गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांच्या सामाजिक कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
चैतन्य महाराजांनी आपल्या मनोगत मध्ये विचार व्यक्त करताना- “ब्राह्मण समाजासाठी गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांनी केलेले कार्य खरोखरच अलौकिक आहे. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अशा कार्यकर्त्यांचा गौरव समाजातील इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देतो,” अशा शब्दांत त्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी पुरस्कारार्थींना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सौ. सुरक्षा द. कुलकर्णी व अभिजीत आवताडे यांनी केले. पुरस्कारार्थी गजाननदादा बिडकर यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव रामकृष्ण बिडकर यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानाबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
बाळकृष्ण वाडेकर यांनीही मनोगत व्यक्त करताना, या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर यांनी केले. प्रमुख पाहुणे श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचा परिचय अभिजीत आवताडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनंत कुलकर्णी यांनी केले.
समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांच्या कार्याचा झालेला हा गौरव म्हणजे त्यांच्या सामाजिक योगदानाला मिळालेली ‘मानाची पावती’ असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास समाजातील मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक तसेच पुरस्कारार्थींचे नातेवाईक सहकुटुंब-सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————–
चौकट : या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमधून निश्चितच प्रेरणा मिळते, असा सूर उपस्थितांमधून उमटला.
Post Views: 8