सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांची होणारी गर्दी आणि सुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नगर अभियंता नीलकंठ मठपती, प्रकाश दिवांजी, विभागीय अधिकारी विजय लोखंडे, एम. बक्षी, प्रकाश सावंत, राघवेंद्र गायधनकर, मनोज जाधव, चेतन प्रचंडे, शेखर सकट, भास्कर सामलेटी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर कोंड्याल यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट व विष्णू घाटाची पाहणी केली. त्यानंतर तुळजापूर रोडवरील खान, माढा विहीर तसेच धर्मवीर संभाजी तलाव येथील विसर्जन स्थळांची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली.तुळजापूर रोडवरील खान परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने या ठिकाणी विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोठ्या मूर्तींसाठी क्षमतेनुसार क्रेन, रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियोजन, प्रकाश व्यवस्था, बॅरिकेडिंग तसेच पुरेशा संख्येने जीव रक्षक उपलब्ध ठेवण्याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
विसर्जन स्थळांवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग, स्वच्छता, पाणी, विद्युत व प्रकाश व्यवस्था, बॅरिकेडिंग आणि सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जीव रक्षकांची नियुक्ती आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे करण्यावरही भर देण्यात आला.
गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही विसर्जनापूर्वी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये
गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विसर्जन उत्साहपूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पडावे, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. मोठ्या प्रमाणात विसर्जन होणाऱ्या ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विसर्जनाच्या दिवशी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महापालिका, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही महापौर कोंड्याल यांनी दिले.
———
Post Views: 13