सोलापूर – महाराष्ट्रात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून, सोलापुरातील मानाच्या श्री कसबा गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त श्री कसबा गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणाचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सोलापूरसह कर्नाटकातून आलेल्या महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हजारो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणात सहभागी होत भक्तिमय वातावरण निर्माण केले.
अथर्वशीर्ष पठणानंतर ओंकार धुम्मा, बिपिन धुम्मा तसेच नगरसेविका बबीता धुम्मा यांच्या हस्ते श्रींची मनोभावे पूजा करण्यात आली. यावेळी मंडळाच्या महिला सदस्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच मंडळाचे विश्वस्त बिपिन धुम्मा यांनी गणेशोत्सव काळात होणाऱ्या विविध धार्मिक विधींची माहिती दिली.
यावेळी मानाच्या श्री कसबा गणपती मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकर्ते आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक अथर्वशीर्ष पठणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.




















