सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इच्छा भगवंताची’ नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. गोरे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मंडळाने मदतीचा हात पुढे केला.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, नगरसेविका अंबिका गायकवाड आणि अॅड. अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहराध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगरसेविका चैत्राली गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दीर्घायुष्य लाभावे आणि राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी ग्रामदैवत श्री रूपाभवानी मंदिरात अभिषेक व महाआरती करून देवीचरणी साकडे घातले.
Post Views: 8