बार्शी – तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान मैदानावरील खडे पायाला टोचल्याबाबत मुलीने आपल्या वडिलांना सांगितले आणि यावर मुलीला झालेला त्रास पाहून तिचे वडील प्रकाश बापूसाहेब कानगुडे यांनी आपल्या मुलीसह इतर मुलींनाही अशा अडचणींचा सामना करावा लागू नये, या भावनेतून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलींना खेळाचे शूज घेण्यासाठी आर्थिक मदत दिली आहे.
पानगाव ता.बार्शी येथील संत तुकाराम विद्यालयाने सासुरे त्ता.बार्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता.यामध्ये एकोणीस वर्षाखालील क्रिडा स्पर्धेत कबड्डी,लांब उडी आदी क्रीडा प्रकारात मुलींनी सहभाग घेतला होता.यामधे ऐश्वर्या प्रकाश कानगुडे हिने मुलींना येत असलेल्या अडचणीची माहिती वडिलांजवळ बोलून दाखवली होती. यावर प्रकाश कानगुडे यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी मुलीना खेळाचे बूट घेण्याचे ठरवले आणि थेट शाळेत भेट देत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद कसबे यांचेकडे खेळाच्या शूजसाठी आर्थिक मदत शाळेकडे सुपूर्द केली. आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध नसल्यास खेळाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे कधी-कधी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपल्या मुलीच्या अनुभवातून इतर मुलींचीही अडचण ओळखून प्रकाश कानगुडे यांनी याकामी घेतलेला हा पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय म्हणून पहिला जात आहे.स्वतःच्या मुलीच्या वेदनेतून इतर मुलींच्या अडचणी समजून घेऊन श्री कानगुडे यांनी या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला आहे.
Post Views: 10