पंढरपूर – ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी लढणारी ही संघटना राष्ट्रहितासाठी कार्य करते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच पुणे विभागाचा विचार केला तर ५८ तालुक्यात ही परिषद पोहोचली आहे. ‘जिथे शिक्षक तिथे शिक्षक परिषद’ आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आत्तापर्यंत महाराष्ट्रात सतरा उमेदवार अर्थात सतरा आमदार निवडून दिलेले आहेत आणि शिक्षण परिषदेने निवडून दिलेले सर्व आमदार हे चारित्र्य संपन्न आहेत आणि समाजाची जाण असणारे प्राध्यापक, प्राचार्य, आयआयटीयन पासून ग्रामीण भागातील उमेदवार शिक्षक परिषदेने दिले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे उमेदवार शिक्षक परिषदेने आजपर्यंत दिलेले आहेत. चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणून परिषदेने डॉ. रोंगे सरांची निवड केली आहे. पाठीमागील इतिहास पाहता यंदा डॉ. बी. पी. रोंगे सरांचा विजय निश्चित आहे म्हणून डॉ. रोंगे सरांना आम्ही पाठिंबा देत आहोत.’ असे प्रतिपादन राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांनी केले.
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभाग प्रमुख सुरेश राठोड माहिती देत होते. यावेळी सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे महानगरचे कार्यवाह विष्णू मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख अरुण देवकते आणि शिक्षण परिषदेचे जेष्ठ सदस्य शिवाजीराव भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे सर म्हणाले ज्यावेळी पुणे विभाग शिक्षक निवडणूक जवळ आल्याची चाहूल लागली तेंव्हापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांत असलेल्या शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांशी प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संवाद साधत आलोय. त्यानंतर कोणतेही शिक्षक, प्राध्यापक हे रजिस्ट्रेशन (नोंदणी)पासून दूर राहिला नाही पाहिजे यासाठी आमच्या यंत्रणेने रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत घेतली. त्यातून हजारो शिक्षकांचे रजिस्ट्रेशन केले आहे. शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्थापक आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. या सर्वांमधून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मला शिक्षकांच्या समस्या समजल्या. सर्वांतून एकच सांगतो की प्रामाणिक प्रयत्न केल्यास, प्रचंड जिद्द असेल तर कितीही अवघड काम पुर्णत्वाला जाऊ शकते. यासाठी मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांच्या प्रेमाने आणि त्यांच्या पाठिंब्याने मी विजयी होणार असून त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही देतो.’ असे सांगून त्यांनी आपले दीर्घ विचार प्रकट केले.
सुरेश राठोड म्हणाले की, ‘शिक्षक परिषदेने पाचही जिल्ह्यांत जाऊन चाचपणी केली असून सासवडला यासाठी मोठा निर्धार मेळावा भरवला होता. एकूणच पक्ष विरहित कार्य असताना शिक्षक परिषदेच्या पाठबळावर ताकत वाढवत आहोत. परिषदेच्या वतीने केलेल्या नोंदणीतील वैचारिक धारा संपन्न असणारे १५ हजार मतदार आहेत व डॉ. रोंगे सरांना वैयक्तिक ओळखणारे २२ हजार मतदार आहेत म्हणजे एकूणच याच ठिकाणी डॉ. रोंगे सरांचा विजय निश्चित आहे.’ असे सांगून त्यांनी परिषदेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
Post Views: 18