वैराग – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी केवळ मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरबा-दांडियापुरते मर्यादित न राहता, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सतत व्यस्त राहणाऱ्या व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि त्यांच्या विविध व्याधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उच्च सामाजिक बांधिलकीतून ‘एकता महिला मंच’च्या वतीने आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दहिटणे (ता. बार्शी) येथे एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दहिटणे गावातील माता-भगिनी आणि युवतींचा उदंड व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवांदनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर व ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्त्रीशिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
तज्ज्ञ वैद्याकीय मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार
या शिबिरात वैराग येथील नामांकित ‘सनराईज हॉस्पिटल अँड मॅटर्निटी’ यांच्या माध्यमातून विशेष सेवा देण्यात आली. संस्थेच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. आफ्रिन शेख-नदाफ यांनी शिबिरात उपस्थित सर्व महिलांची अत्यंत आत्मीयतेने व कसून आरोग्य तपासणी केली.
तपासणीदरम्यान डॉ. आफ्रिन नदाफ यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळीच्या समस्या, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व ते वाढवण्याचे उपाय, विविध शारीरिक व्याधी, संधिवात, गर्भाशयाचे आजार, स्तन कर्करोग जनजागृती तसेच दैनंदिन आहारातून स्वतःचे आरोग्य कसे जपावे, यांसारख्या महिलांच्या विविध गंभीर व आरोग्यविषयक संवेदनशील विषयांवर अत्यंत सोप्या, प्रभावी व मार्मिक भाषेत बहुमोल मार्गदर्शन केले.
या शिबिरात ‘सनराईज हॉस्पिटल अँड मॅटर्निटी’ वैराग यांच्यावतीने तपासणी केलेल्या सर्व महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत गोळ्या-औषधांचे वाटप करण्यात आले, ज्याचा उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
सामाजिक बांधिलकीतून साकारलेला संकल्प: प्रभाकर क्षीरसागर
या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर म्हणाले, “नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी केवळ मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरबा दांडियापुरते मर्यादित न राहता, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि त्यांच्या विविध व्याधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे या सामाजिक बांधिलकीतूनच या भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”
मान्यवरांची विशेष उपस्थिती व सहभाग
या कार्यक्रमासाठी डॉ. अबीद नदाफ आणि डॉ. आफ्रिन नदाफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ‘एकता महिला मंच’चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर,आरोग्य सेवक शिवाजी आवारे, आरोग्य सेविका कान्होपात्रा आमले, एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, सुरेखा कोळी, वनिता जगताप, आरती कोळी, नीता सुतार, विश्रांता शेळके, रेखा काशीद यांच्यासह मंचच्या इतर सन्माननीय सदस्या व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व नेटके सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रभाकर क्षीरसागर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार लक्ष्मी सुतार यांनी मानले. ‘एकता महिला मंच’ने राबवलेल्या या आरोग्यदायी व समाजोपयोगी उपक्रमाबद्दल ग्रामीण स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 14