सोलापूर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती देण्यासाठी ग्रामसेवकांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामसेवकांना दिवाळीपूर्वीच कालबद्ध पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आणि प्रशासकीय कामकाजात कार्यक्षमता दाखविणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी गावातील सामाजिक कार्य, दप्तराची अद्ययावत नोंद, घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली, नियमित पाणीपुरवठा आणि गाव तंटामुक्त ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे.
याशिवाय पेपरलेस कामकाज, मनरेगाअंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी, सर्व नोंदवह्या व्यवस्थित ठेवणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, अशा विविध निकषांवर ग्रामसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून कामगिरीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. त्यापैकी दोन तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित तालुक्यांचे अहवाल २ तारखेपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
पदोन्नतीचे प्रस्ताव अंतिम छाननीत
ग्रामसेवकांना कालबद्ध पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. हे प्रस्ताव प्राप्त झाले असून, सध्या त्यांची अंतिम छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ग्रामसेवकांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ग्रामसेवकांना आर्थिक लाभासह पदोन्नतीची आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
कोट
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधताना ग्रामसेवकांनी प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामकाजाला प्राधान्य द्यावे. उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान आणि पात्र कर्मचाऱ्यांना योजनांचे लाभ देण्यावर पंचायत विभागाचा भर असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी स्पष्ट केले.