प्रिसिजन बुक क्लबच्या आजच्या खंदक बागेतील भेटीत वाचनासोबतच निसर्ग, संशोधन, अध्यापन आणि भटकंतीच्या अनुभवांची एक समृद्ध मैफल रंगली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. संध्या रघोजी मॅडम यांनी शेफाली वैद्य लिखित नित्य नूतन हिंडावे या पुस्तकाचा परिचय करून दिला. नोकरी, व्यवसाय आणि आवड या निमित्ताने शेफाली वैद्य यांनी केलेल्या विविध ठिकाणच्या भटकंतीचे अनुभव, तसेच त्या त्या प्रदेशाची संस्कृती आणि वारसा यांवरील लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.
आजच्या भेटीचे विशेष आकर्षण होते पक्ष्यांची दुनिया या पुस्तकाचे लेखक, प्रा. डॉ. अरविंद कुंभार यांची उपस्थिती. अकलूज येथील महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या डॉ. कुंभार यांनी आपल्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि निसर्गभ्रमंतीच्या अनुभवांचा खजिना उपस्थितांसमोर उलगडला. बुक क्लबचे सदस्य आणि त्यांच्या विविध उपक्रमांनी आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले.
डॉ. कुंभार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कन्नड माध्यमातून झाले. सातवी-आठवीत असतानाच त्यांना पशु-पक्षी आणि त्यांच्या निरीक्षणाची आवड निर्माण झाली. पुढे सोलापुरात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेट प्राप्त केली. मालवण आणि चिपळूण येथे नोकरी करत असताना त्यांना निसर्गाचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अकलूज येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी अध्यापनाची पारंपरिक चौकट मोडत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस थेट निसर्गाच्या सान्निध्यात नेऊन संशोधनात्मक धडे देण्याची अभिनव पद्धत सुरू केली. त्यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले.
अध्यापनाबरोबरच त्यांची संशोधकवृत्ती सतत कार्यरत राहिली. त्यांच्या कार्यातील सर्वाधिक प्रेरणादायी पैलू म्हणजे चार एकर पडीक जमीन विकत घेऊन त्यांनी तिथे विविध प्रकारची झाडे लावत अक्षरशः नंदनवन फुलवले. अभ्यासपूर्वक आणि मायेने जोपासलेली ही झाडे आपल्याशी संवाद साधतात, असे ते सांगतात. विशिष्ट हवामान आणि तापमानाची गरज असणारा फणसही त्यांनी या ठिकाणी यशस्वीपणे उगवून दाखवला. या हिरवाईमुळे परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला.
नोकरीसोबतच पत्रकारितेची आवड जोपासत त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे तीन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. एम.फिल. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
भटकंती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. बुलेटवरून त्यांनी अनेक राज्यांत भ्रमंती केली आहे. प्रवासामुळे विविध अनुभव मिळतात आणि त्यातून निसर्ग तसेच लोकसंस्कृती यांच्या अधिक जवळ जाता येते, असे त्यांनी सांगितले.
निसर्ग आणि संशोधनाइतकीच त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याचीही आवड आहे. कागदी लिफाफे तयार करणे, घरच्या मंगलप्रसंगी मसाला पाने तयार करणे, छोट्या-मोठ्या दुरुस्त्या करणे अशा अनेक गोष्टी ते स्वतः करतात. पंजाब आणि हरियाणा परिसरात भ्रमंती करताना तंदूर भट्टी लावण्याची कला त्यांनी स्वतः शिकून घेतली आणि ती आपल्या घरीही उभारली. “सर्वांनी कौशल्य विकासावर सतत भर दिला पाहिजे,” हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
‘समानशीलेषु व्यसनम्’ या संस्कृत उक्तीचा संदर्भ देत त्यांनी आपल्यासारख्याच आवडी जोपासणाऱ्या नांदेडच्या प्रा. चव्हाण यांच्याबद्दलही माहिती दिली.
अध्यापन, संशोधन, निसर्ग आणि भ्रमंती या चारही क्षेत्रांतून मिळालेले अनुभव अत्यंत रंजक पद्धतीने कथन करत डॉ. कुंभार यांनी उपस्थित वाचक-श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. “माझ्या स्वभावानुसार मी तुम्हा वाचकांशी लगेच समरस होऊ शकेन,” असे त्यांनी संवादाच्या सुरुवातीलाच म्हटले होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या सहज, मनमोकळ्या संवादातून त्या विधानाची प्रचिती प्रत्येकाला आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. बावळे यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘लोककला’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सर्वांना दिली.
वाचनाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या प्रिसिजन बुक क्लबच्या या भेटीत आज पुस्तकाच्या पानांपलीकडचे जग उलगडले—निसर्गाचे, संशोधनाचे, कौशल्यांचे आणि सतत शिकत राहण्याचे. त्यामुळे आजची भेट केवळ पुस्तक परिचयाची न राहता ‘जगण्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा’ प्रेरणादायी अनुभव ठरली.
Post Views: 14