मोहोळ – मोहोळ पंचायत समितीला १ कोटी ६९लाख रुपयाचा पुन्हा विकास निधी प्राप्त झाला असून, मागच्या आंदोलन उपोषणाचा मागील निधी वाटपाचा अनुभव लक्षात घेता पंचायत समितीच्या मासिक सभेत यावर चर्चा करुनच समान निधी वाटपाचा आराखडा तयार करून तो मंजुरी साठी वरिष्ठाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीतील भाजपाचे गटनेते . संजीव दादा खिलारे यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना गटनेते खिलारे म्हणाले, गेल्या सहा महिन्या पूर्वी ७कोटी २९ लाख रुपयाचा विकास निधी पंचायत समितीला प्राप्त झाला होता. मात्र त्या निधी वाटपा संदर्भात सभागृहात चर्चा केली नाही, आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप करत पंचायत समितीतील विरोधी गटनेते बाळासाहेब गायकवाड व त्यांच्या सहकार्यानी सभात्याग केला होता. ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे त्या ठिकाणी मोकळ्या हाताने निधी वाटप केला, तर ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार पराभूत
झाला त्या ठिकाणी हात आखडता धरून अत्यल्प निधी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा गंभीर आरोप गटनेते गायकवाड यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी दोन दिवसाचे उपोषणही केले होते यात विद्यमान आमदार राजू खरे यांनीही लक्ष घालून हा निधीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. सध्या पंचायत समितीमध्ये भाजपाचे सात तर विरोधकांचे पाच सदस्य आहेत.
७ कोटी २९ लाखाचा निधी वाटप करताना भाजपाचे गटनेते खिलारे यांना ही सभापतींनी विचारात घेतले नव्हते ते पक्षाच्या कामा निमित्त परगावी गेले होते. तसे लेखी पत्र ही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यांना सभेची नोटीस सात दिवस अगोदर मिळणे अपेक्षित असताना केवळ चार दिवस अगोदर मिळाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान सात कोटी 29 लाखाच्या निधी वाटपा वेळी झालेला गोंधळ आरोप प्रत्यारोपाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेत सभेतच निधी वाटपावर चर्चा होऊन मगच आराखडा तयार करून तो मंजुरी साठी पाठविण्यात येणार असल्याचे गटनेते खिलारे यांनी सांगितले. त्यामुळे या निधी वाटपाकडे सर्व सदस्यांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 7