तुळजापूर – आई राजा उदो उदो… जय भवानी, जय तुळजाभवानी… अशा जयघोषाने तुळजाई नगरी दुमदुमू लागली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या कोजागिरी पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांच्या पावलांनी शहराकडे जाणारे रस्ते गजबजून गेले आहेत. सोलापूरहून हजारो देवीभक्त पायी चालत तुळजापूर नगरीत दाखल झाले असून, पौर्णिमेला सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापुरात मुक्कामी आगमन झाले आहे. सोमवारी तुळजाभवानी मंदिरात मानाच्या काठ्यांसह निघणारी छबिना मिरवणूक यात्रेचे खास आकर्षण ठरणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा ही तुळजाभवानी देवीच्या वर्षातील प्रमुख यात्रांपैकी एक मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि सोलापूर परिसरातून मोठ्या संख्येने देवीभक्त पायी प्रवास करून तुळजापूरच्या दिशेने येत आहेत. अनेक भाविक चार-पाच दिवसांपासून पायी वारी करीत असून, लांबचा प्रवास आणि पायातील थकवा यांची पर्वा न करता ते आईच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करीत आहेत. रविवारी तुळजापूर शहराच्या परिसरात भाविकांची संख्या वाढली असून, अनेक ठिकाणी भाविकांचे मुक्काम सुरू झाले आहेत.
कोजागिरी पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवीच्या निद्रेचा विधी पूर्ण होऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. त्यानंतर देवीचे दर्शन आणि मुखदर्शन सुरू होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवाच्या धर्तीवर नियोजित दर्शन मार्गाने भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूरमध्ये अवघी तुळजाई नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. कुणी कुटुंबासह, कुणी मित्रमंडळीसोबत, तर कुणी पारंपरिक वारी आणि मानाच्या काठ्यांसह पायी प्रवास करीत आहे. रस्त्यांवरून पुढे सरकणारी भक्तांची पावले, आकाशात फडकणाऱ्या भगव्या पताका आणि सर्वत्र घुमणारा ‘आई राजा उदो उदो’चा गजर यामुळे तुळजापूर नगरीत भक्तीचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरहून हजारो भाविकांचे आगमन, मानाच्या काठ्यांचा मुक्काम आणि सोमवारी होणारी काठ्यांसह छबिना मिरवणूक यामुळे कोजागिरी पौर्णिमा यात्रेचा उत्साह अधिकच वाढला असून, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजाई नगरी भाविकांनी फुलून गेली आहे.
चौकट
मानाच्या काठ्यांच्या आगमनाने यात्रेचा उत्साह द्विगुणित
सोलापूरहून तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांच्या वारीला पारंपरिक धार्मिक महत्त्व आहे. पौर्णिमेला सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठय़ा वाजत गाजत तुळजापुरात दाखल होतात. मानाच्या काठ्यांसह येणाऱ्या भाविकांच्या आगमनामुळे यात्रेतील उत्साह अधिकच वाढला आहे. हातात भगव्या पताका, खांद्यावर मानाच्या काठ्या आणि ओठांवर आई तुळजाभवानीचा जयघोष करीत भाविक तुळजापूर नगरीत दाखल होत आहेत. अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या भाविकांसाठी आईचे दर्शन हेच यात्रेचे मुख्य ध्येय आहे. मानाच्या काठ्यांच्या मुक्कामामुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, यात्रेच्या पारंपरिक स्वरूपाचे दर्शन घडत आहे.
सोमवारी काठ्यांसह छबिना मिरवणुकीची पर्वणी
कोजागिरी पौर्णिमेच्या मुख्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये सोमवारी तुळजाभवानी मंदिरात निघणाऱ्या छबिना मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. मानाच्या काठ्यांसह निघणारी ही मिरवणूक भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सोलापूरच्या मानाच्या काठ्यांची परंपरा आणि आई तुळजाभवानीच्या छबिन्याचे धार्मिक महत्त्व यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. छबिना मिरवणुकीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, तुळजाई नगरीत धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
Post Views: 6