सोलापूर : शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणांविरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी धडक कारवाई करत एसटी स्टँड परिसरातील अनधिकृत फळ विक्रेते, खोके हटविले. तसेच डफरीन हॉस्पिटल परिसरातील अनधिकृत रसपान गृहावरही कारवाई करण्यात आली.
एसटी स्टँड परिसरात रस्त्याच्या कडेला व पदपथांवर उभारण्यात आलेले अनधिकृत खोके आणि फळ विक्रेत्यांमुळे वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने कारवाई करून अतिक्रमणे हटविली. त्यानंतर डफरीन हॉस्पिटल परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या रसपान गृहावरही कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्या पथकाने ही मोहीम राबविली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरातील रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा धडक मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे.
Post Views: 9