टेंभुर्णी – श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज तसेच सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल, टेंभुर्णी येथे १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक जागरूकता, आरोग्याविषयी सजगता, आर्थिक साक्षरता, सामाजिक जबाबदारी आणि मूल्यशिक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सतीश वागावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलचा मर्यादित वापर, उघड्यावर मिळणारे अन्न टाळणे, सकस व संतुलित आहार घेणे तसेच नियमित व्यायाम करणे या सवयी आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र कृषी दिन आणि कृषी सप्ताहानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले कृषी संशोधक डॉ. प्रशांत कुंभार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, कृषी संशोधन तसेच बदलत्या काळात कृषी क्षेत्रातील नव्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शाश्वत आणि उत्पादक शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय पद्धती यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता भोसले व डॉ. पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी सवयी आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉक्टरांचे समाजातील योगदान, चार्टर्ड अकाउंटंट्सची आर्थिक व्यवस्थेतील भूमिका तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्व यावर मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांकडून आरोग्य जागरूकतेची शपथही घेण्यात आली.
या उपक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिव सुरज बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रशांत कुंभार, डॉ. सतीश वागावकर, डॉ. संजय जोशी, डॉ. अण्णासाहेब पवार, डॉ. स्मिता भोसले, डॉ. पूजा पाटील, प्राचार्य विकास करळे, अकॅडेमिक डायरेक्टर शाहिदा पठाण, प्राचार्य प्रभाकर बेनकप, पीआरओ सागर खुळे तसेच दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक व बौद्धिक जाणीवा विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post Views: 4