सोलापूर : येथील जुळे सोलापुरात राहणारा तरुण अखिलेश अनंत देशपांडे याची जगातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’ (Air India) मध्ये पायलट पदावर निवड झाली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने घेतलेली ही उत्तुंग झेप सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
अखिलेश याने आपले प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या नूतन मराठी विद्यालय (नु. म. वि.) येथून, तर माध्यमिक शिक्षण सुयश विद्यालयातून पूर्ण केले. बालपणापासूनच विमान चालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अखिलेश याने अत्यंत चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने ‘फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमी’ हैदराबाद मधून कमर्शियल पायलटचे (CPL) प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून मल्टी-इंजिन प्रशिक्षण आणि दुबई येथून प्रगत टाईप रेटिंगचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. वैमानिक प्रशिक्षणासोबतच त्याने ‘बी.एस्सी. एव्हिएशन’ आणि ‘एमबीए’ (MBA) पदवीही संपादन केली आहे. अखिलेश याचे वडील अनंत देशपांडे हे इलेक्ट्रिकल व्यवसायात कार्यरत असून, त्यांच्या पाठबळामुळे आणि अखिलेश याच्या कठोर परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे. नुकतेच १८ जून रोजी अखिलेश हा पुढील प्रशिक्षणासाठी नवी दिल्ली येथे एअर इंडियाच्या सेवेत रुजू झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सोलापूरच्या विविध स्तरांतून आणि त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.