सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत अमेरिकेच्या समीर बॅनर्जी याने विजेतेपद पटकाविले.
येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत अंतिम फेरीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या समीर बॅनर्जी याने तिसऱ्या मानांकित भारताच्या करण सिंगचा 2-6, 6-4, 7-6(4) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 2 तास 7 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये करणने वर्चस्व राखत हा सेट समीरविरुद्ध ६-२ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये समीरने जोरदार खेळ करत नवव्या गेममध्ये करणची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये समीरने आक्रमक खेळ करत करण विरुद्ध हा सेट 7-6(4) असा जिंकून विजय मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 4 लाख 39 हजार 062/-रुपये व 25आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक, 2 लाख 57 हजार 135/-रुपये व 14आयटीएफ गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योगपती विकास सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक लीना नागेशकर नेविल पिठावाल , पंकज शहा , वामसीकृष्ण देवसानी, मोनिका आळंद , श्रीकांत कामरेड्डी खेळाडू व पालक इतर मान्यवर उपस्थित होते. एकेरीच्या विजयी व उपविजयी खेळाडूंना रूबी ट्रॅव्हल चे संचालक असिफ पटेल यांच्या तर्फे भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्र संचालन एमएसएलटीएचे सहसचिव व स्पर्धा संचालक राजीव देसाई यांनी केले.





















